वैराग
, सोलापूर
जिल्ह्यातले एक छोटे गाव, जिथे माझे आजोबा श्री पं. ना. कुलकर्णी व आजी चारुशीला कुलकर्णी यांनी त्यांचे बरेचसे जीवन व्यतीत केले. आबा मुख्याध्यापक, उत्तम लेखक आणि वक्ते तर आजी शिक्षिका. दोघांना मुकुंदराज, संजय व शेखर अशी तीन सुसंस्कारी, निर्व्यसनी व उच्चशिक्षित मुले आणि अमिता (मुकुंदराज), अपर्णा (संजय) व रंजना (शेखर) या सेवाभावी स्नुषा. स्वप्ना, चैतन्य, नीलेश, श्रद्धा, नचिकेत अशी नातवंड. कोणालाही हेवा वाटावा असा आबांचा गृहस्थाश्रम होता; दृष्ट लागावी असा. ती लागतेच; नाही का?! 'जीवनात फक्त मृत्यू हे एकच सत्य आणि शाश्वत आहे' असे एक आबांचेच वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. हे वाक्य मी आठ-नऊ वर्षांची असताना ऐकले होते. तेंव्हा त्याचा अर्थ समजावा हे वय नव्हते आणि अगदी तीस वर्षांची होईपर्यंत, त्याचा अर्थ समजून घ्यावा अशी वेळ आणि परिस्थिति उद्भवली नव्हती.
पैश्यात मोजली जाणारी श्रीमंती आणि टाटा बिर्ला अंबानी माहीत नव्हते, तेंव्हा आपणच जगातले सगळ्यात समृद्ध आहोत असे वाटायला लावणारे बालपण आम्हा पाच जणांच्या वाट्याला आले. आमचे वैरागचे घर हेच आमचे जग होते आणि त्या जगाचा केंद्रबिंदु होते आमचे शेखर काका. लहान मुलांमधे लोकप्रिय असणे, त्यांना सहजतेने प्रभावित करणे, मूल होऊन त्यांच्याबरोबर खेळणे किती कर्मकठीण काम आहे हे मला स्वतःला मूल झाल्यावर मला समजले. शेखर काका हे सर्व अगदी नैसर्गिकपणे करायचे. याला कारण होता त्यांचा निर्व्याज, निष्पाप, खेळकर स्वभाव! कोणत्याही सणांची celebrations काकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. दिवाळीला फटाके वाटून देणे , किल्ला बनवणे , अंगणात क्रिकेट , स्टॅन्ड वरचा वडा , दुपारी सगळ्या बायका दमल्या असतील म्हणून चहा करणे , असं सगळं फक्त तेच करू शकायचे. आम्हा मुलांचे फॅशन शो घेणें , आम्हाला रस्त्यावर बसायला घेऊन जाणे , इ -बबबबब करून ढेकर देणे , गाडी लोड करा रे म्हणणे , केदारलिंग मंदिरात घेऊन जाणे अश्या अगणित सुंदर आठवणी शेखर काकांमुळे आम्हाला मिळाल्या. देवासमोर हात जोड़ा, प्रार्थना म्हणा किंवा काहीही हे करा, ते करा असा उपदेश ते कधीच करायचे नाहीत तर स्वतः तसे वागून सोदाहरण दाखवून द्यायचे. त्यांच्या अतिशय सुंदर आवाजात ते करुणात्रिपदी, दत्ताचि भजनं म्हणायचे; ते ऐकून आम्ही आपोआपच ते सगळे शिकलो आणि ते आवडू ही लागले. वैराग ला थोड़स गावाबाहेर एक तळ आणि तळ्याकाठी दत्ताचे सुंदर देऊळ आहे. शेखर काका, आजी, मी त्या देवळात आहोत आणि शेखर काका दत्ताची भजन म्हणत आहेत असे एक Fond Visual कायमच मला दिसत असते. लहानपणी आमच्याबरोबर खेळणारे शेखर काका, तरुणपणी माझ्यासाठी दूसरे बाबा होते. ते स्वतः शासकीय तंत्रनिकेतन मधे प्राध्यापक असल्याने अभ्यासात मदत करणे, हवी ती पुस्तके आणून देणे, माझ्या प्राध्यापकांना भेटून विचारपूस करणे असे ते नेहमी करायचे; अगदी effortlessly!
आमच्यासाठी ते फ़क्त आमचे लाडके शेखर काका असले, तरी ते एक अत्यंत यशस्वी प्राध्यापक, विद्यार्थी प्रिय शिक्षक, आणि अनेक नातेवाईकांसाठी हक्काचे विसाव्याचे स्थान होते.
१७ एप्रिल २०१८ ची क्रूर सकाळ. नेहमीप्रमाणे ऑफिस ला जाताना मी आईला फ़ोन केला. तीने उचलला नाही. अजून ३ वेळा केला तरीही उचलला नाही. भारतात रात्रीचे ८-९ वाजलेले होते; का बर उचलला नसेल असा विचार करत ऑफिस ला पोहोचले. पुढचा फ़ोन चैतन्य ला केला; त्यानेही उचलला नाही. मग मात्र खूपच अस्वस्थ वाटायला लागले कारण चैतन्य फ़ोन उचलत नाही असे सहसा होत नाही. त्यानंतर फ़ोन चा सपाटा लावला पण कोणीच उत्तर देत नव्हते. शेखर काकांना मेसेज केला
आजपासून परत कधी त्यांच्याशी बोलता येणार नाही, त्यांचा आपुलकीचा, आस्थेने चौकशी करणारा फ़ोन येणार नाही याची पुसटशीही कल्पना नव्हती. तो दिवस असाच गेला. मी जंग जंग पछाडले तरी कोणी उत्तर देत नव्हते. शेवटी रात्री २ वाजता, मि अल्टीमेटम दिल्यावर बाबांचा मेसेज आला आणि पायाखालची जमीनच सरकली. Our Shekhar Kaka, Road Accident , No More असे फ़क्त शब्द डोळ्यासमोर फिरत होते; झालं आहे ते नक्की काय झालं आहे हे समजून घ्यायची ताकदच राहिली नव्हती. एवढं मोठ दुःख पचवण्याची रंगीत तालीम कधीच मिळत नसते.
असे का झाले, आमचेच कुटुंब का? शेखर काकाच का? असे कर्माच्या सिद्धांताला तडे पाडणारे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. हे सगळच अगम्य आहे. शेवटी जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला हेच खरे!
आपल्याला शक्य तितकि मदत इतराना करणे, स्वतःहून सर्वांच्या संपर्कात रहाणे आणि take life in stride असं वागायचे मी तरी ठरवले आहे कारण, हीच शेखर काकांसाठी सर्वोत्तम श्रद्धांजली आहे.
 |
| काका आणि नात - ईशा |
 |
| काका - रंजना काकू |
 |
| कुलकर्णी कुटुंबीय |
 |
| काका काकू |
 |
| काका - त्यांच्या प्रसन्न हास्यासमवेत |
 |
| काका काकू |
 |
| आम्ही सगळे |
 |
| काका |